अजूनही आठवतेय ती दुपारची वेळ…पाऊस पडत होता…मध्ये मध्ये कमी होत होता..तर मध्येच कधी तरी त्या पावसाचा जोर वाढत होता..दिवाण घर अंधारून गेले होते..कशातही लक्ष लागत नव्हते…शेवटी तानपुरा हाती घेतला आणि पावसाच्या लयीवर राग मल्हार चा सूर आळवायला सुरवात केली…
माज घरातून ती दिवाण घराच्या दरवाजा पर्यंत आली…आणि निघून गेली…परत एकदा येऊन दिवाण घराच्या दाराशी थबकली..नंतर हळू हळू हलकेच आत येऊन बसली..तिच्या हातात शिवण कामाचे काही सामान होते..मान खाली घालून तिने टाके घालायला सुरवात केली..नंतर तिने काम थांबवले…खिडकीशी येऊन भिजलेल्या झाडाझुडपांना न्याहाळू लागली..
पाऊस थांबला आणि माझे गाणे पण संपले…ती उठून केस विंचरायला गेली…
हे एवढंच…विशेष काहीच नाही…पाऊस, गाणे, अंधार आणि आळस ह्यांनी भरलेली ती एक दुपारची वेळ…
इतिहासाच्या कितीक गोष्टी असतात..राजा बादशाहाच्या…युद्ध आणि तहाच्या रोमांचक कहाण्या…
परंतु ह्या दुपारची हि एव्हढी शी गोष्ट..एखाद्या मूल्यवान हिर्या प्रमाणे काळाच्या पडद्यात अडकून राहील…आणि फक्त दोघेच आहेत ज्यांना ह्या साध्याशा गोष्टीची जाणीव राहील….
—————-रवींद्र नाथ ठाकूर…