सुओ राणीची इच्छा…

एका राजाला दोन राण्या..एक सुओ राणी म्हणजे आवडती आणि दुसरी दुओ राणी …म्हणजेच नावडती..

सुओ राणी चा बहुतेक मरण काळ आला ..ती अगदी मलूल होऊन पडली..तिला काहीच आवडेनासे झाले..वैद्य औषध घेऊन आला..मधात कालवून देत म्हणाला “घ्या औषध”.. तर तिने दूर फेकून दिले..

राजाला बातमी गेली..राजा लगेच सभा सोडून आला..जवळ बसून विचारले..”तुम्हाला राणी काय झालेय? काय हवय?”

राणी रागावून बोलली, “तुम्ही सगळे जा बघू..माझ्या सखीला फक्त बोलवून आणा”..

सखी आली..राणी म्हणाली, “सखी, बस ना..एक सांगायचंय…”

सखी म्हणाली, “अगं , मन मोकळे करून बोल”..

सुओ राणी सांगू लागली, “माझ्या सात महाला पलीकडे दुओ राणीचे तीन महाल होते.. त्या नंतर तिचे दोन महाल होते.. मग एकच राहिला..शेवटी ती राज महालातून निघूनच गेली. मी तर विसरून पण गेले होते दुओ राणीला..पण होळीच्या दिवशी….मयूर पालखीत बसून जात होते मी नाट्य मंदिरात..पुढे लोक..पाठी मागे सैनिक..उजव्या हाताला वाजत होती बासरी..तर डाव्या हाताला मृदंग..

त्यावेळी एका बाजूला नदीकिनारी पाहिले मी छोटे गवती घर..चंपक वृक्षाच्या सावलीत..समोर प्राजक्ताची फुले उमललीत ..दारा समोर सुंदर रांगोळी..मी सेवकाला विचारले हे सुंदर घर कोणाचे?? सेवक म्हणाला दुओ राणीचे..

त्यानंतर घरी येऊन मनच लागेना..चूप होऊन गेले..

राजाने विचारले, राणी, तुम्हाला झालय तरी काय? मी सांगितले मी ह्या घरात राहणार नाही..

राजा म्हणाला..मी तुम्हाला राजवाडा बांधून देतो नवीन..हस्तिदंताचे दार लावलेला..संगम रवरी..मोत्यांनी, कमळ फुलांनी सजवलेला..

मी म्हटले..मला झोपडीत राहायचंय..ह्या बाहेरच्या बागेत..

राजा म्हणाला ठीक आहे होऊ देत तुमच्या मन सारखे..

राजाने गवती झोपडी बांधून दिली..पण हि झोपडी म्हणजे कुठून तरी उपटून आणलेले फुल..मी राहायला गेले..पण का कोण जाणे..खूपच ओशाळले..

नंतर एकदा स्नान यात्रा..नदीवर आंघोळीला चालले होते..पालखीत बसून..बरोबर एकशे सात दासीचा लवाजमा..पालखी नदीत बुडवून स्नान झाले..परत येताना पालखीचा पडदा सारून बघतेय.. तर कोण हि साध्वी?? जणू पूजेचे फुल..हातात पांढऱ्या बांगड्या..अंगावर लाल साडी..शांत स्निग्ध चेहरा.. स्नान करून कळशी भरून घेतेय..सकाळचे कोवळे ऊन तिच्या ओल्या केसावर चमकतेय..

दासीला विचारले, कोण हि तपस्विनी..कुठल्या मंदिरात राहते?? दासी म्हणाली, ओळखले नाही तुम्ही, महाराणी..हि तर दुओ राणी..

महालात येऊन परत उदास वाटले..मन लागेना..

राजा म्हणाला, काय झाले राणी??

मी म्हटले..माझी एक इच्छा..रोज सकाळी नदी किनारी जावे..मातीच्या कलाशातून पाणी आणावे..

राजा म्हणाला..ओ हो..त्यात काय मोठेसे??

प्रत्येक रस्त्यावर पहारा बसला..सामान्य लोकांना हटवले गेले..

मी पांढऱ्या बांगड्या भरल्या..लाल काठाची साडी नेसली..नदीतून मातीच्या कलशातून पाणी आणले..पण दारा जवळ येऊन तो कलश फोडून टाकला..जे हवे ते नाहीच मिळाले..खूपच लज्जित झाले..

नंतर एक दिवस रास यात्रा..

मधू वनात पौर्णिमा रात्री तंबू उभारला गेला..रात्र भर नाच गाणी झाली..

दुसऱ्या दिवशी हत्तीवर हौद्यात बसून, पडदानशीन होऊन महाली येत होते..तेव्हा पाहिले जंगलच्या दिशेने जात होता एक नव तरुण..हातात एक टोपली..त्यात पद्म फुल…विविध फळे..परस दारीच्या भाज्या…दासीला विचारले हा कोण भाग्यवतीचा पुत्र?? दासी म्हणाली, हा तर दुओ राणी चा मुलगा..आई साठी फळे घेऊन चाललाय …

महालात येऊन खूपच निराश वाटले..परत चूप झाले..

राजा येऊन विचारतोय..काय झाले राणी? काय हवेय आता??

मी म्हटले..माझी खूप इच्छा…आम्ही जंगलातली फळे खाणार..परस दारची ताजी भाजी खाणार..पण आमच्या पुत्राने स्वतः फळे भाज्या काढून आणाव्यात..

राजा म्हणाला..ठीक आहे..जशी तुमची इच्छा …

सोन्याच्या पलंगी बसून होते..मुलगा माझा फळे भाजी एका टोपलीत घेऊन आला..त्याला सर्वांगा ला घाम फुटलेला ..त्याच्या चेहऱ्यावर राग..फळ फुलांची टोपली तशीच पडून राहिली..खूपच ओशाळले मी..

त्यानंतर मला काय होतेय मलाच कळत नाहीय..एकटी बसून राहते..काही बोलत नाही..राजा सारखा विचारतो तुम्हाला काय झालेय??

सुओ राणी होऊन पण काय हवय ते मला कुणालाच सांगता येत नाहीय..म्हणून तुला बोलावले मी सखी…माझी शेवटची इच्छा तुझ्या कानात सांगते सखी.. दुओ राणी चे दुःख मला हवयं …”

सखी गालावर हात ठेवून म्हणाली..”का ग राणी??”

सुओ राणी म्हणाली, “तिच्या सामान्य लाकडाच्या बासरीतुन सूर उमटले..पण माझी सोन्याची बासरी नुसती पडूनच राहिली..तिच्यात कधी सूर उमटलेच नाहीत…..”

–रवींद्र नाथ ठाकूर..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.